पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या संकटकाळात पहिल्या दिवसापासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका, कर्माचारी, अधिकारी व इतर फ्रंटलाइन वर्कर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावत असाताना कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे बेडची मोठी कमतरता भासता आहे. म्हणून महापालिका सेवेतील कोविड योध्दे व त्यांच्या कुटूंबियांकरिता राखीव सुसज्ज वार्ड व विनाविलंब वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तात्काळ तरतूद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती नितीन लांडगे, नगरसेवक शशिकांत कदम आदी उपस्थित होते.
शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलीसांसाठी सुसज्ज वार्ड तयार करण्यात आला आहे. काल (दि.२३) पासून तो स्वतंत्र वॉर्ड कार्यरत करण्यात आला आहे. कोरोनाच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये होणार्या संसर्गाची भीती न बाळगता आपले पोलीस दल काम करीत आहे. त्यांना संसर्गाची जास्त शक्यता असल्यामुळे पोलीस आयक्त कृष्ण प्रकाश व अन्य सर्व अधिकारी तसेच डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांच्या संकल्पनेतून हा अतिशय सुत्य व कौतुकास्पद व अत्यंत गरजेचा उपक्रम सुरू झालेला आहे.
जसे पोलीसदल सध्या अहोरात्र संसर्गाची भिती न बाळगता कार्यरत आहेत, तसेच आपल्या महानगरपालिकेच्या सेवेत असलेले डॉक्टर, परिचारिका व इतर फ्रंटलाइन वर्कर देखील आज अहोरात्र संसर्गाची तमा न बाळगता कार्यरत आहेत. या कोविड योध्दांना तसेच त्यांचे कुटूंबियांना संसर्ग झाला अगर काही आपातकालीन स्थिती निर्माण झाली तर त्यांना देखील प्राधान्याने व तातडीने उपचार व आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा महानगरपालीकेने तात्काळ देणे आवश्यक आहे.
परंतू आज या कोविड योध्दांसाठी अशा प्रकारची तात्काळ उपचारासाठीची कोणतीही तरतुद नाही. शहरातील पोलीस दलासाठी राखीव ठेवण्यात आलेला सुसज्ज वार्ड व सर्व उपाययोजनांच्या धर्तीवर महानगरपालिकेने देखील आपल्या सेवेतील कोविड योध्यांसाठी अशा प्रकाराची राखीव सुसज्ज वार्ड व विनाविलंब वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तात्काळ तरतूद करावी अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group