पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलासाठी तीन फायर फायटींग मोटारबाईक (दुचाकी) खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ४० लाख ४४ हजार खर्च अपेक्षित आहे. त्यासह विविध कामांसाठी एकूण १०१ कोटी ४१ लाख खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.१९) झालेल्या सभेत मंजुरी दिली.
ऑनलाइन झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अँड. नितीन लांडगे होते. चाळीस लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता या फायर फायटींग मोटारबाईकचा आहे. या दुचाक्या शहरातील अरुंद गल्ल्या दाट वस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. ज्या भागात आगीचा बंब जाऊ शकत नाही तेथे या दुचाकीने जाता येणार आहे.
समितीचे अध्यक्ष लांडगे यांनी सांगितले की, या बाईकमध्ये २० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. त्याला ३० मीटर लांबीपर्यंतचा होजरील पाईप जोडले आहेत. या पाईपला प्रेशर नोझल असल्यामुळे फायर फायटींग पंपाद्वारे ५० फुटापर्यंत पाणी फेकले जाणार आहे. तातडीच्या प्रसंगी मोठ्या अग्निशमन वाहनाला आगीच्या ठिकाणापर्यंत सहजतेने पोहोचता यावे याकरीता वाहतूक मार्गातून वाट काढण्यासाठी या दुचाकीचा उपयोग एस्कॉटींग वाहन म्हणून होऊ शकतो. शिवाय पेट्रोलींगसाठीदेखील ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.
पाणीपुरवठा विभागातील ग्रॅव्हीटीअंतर्गत असलेल्या चिंचवड, थेरगाव व सांगवी या जलक्षेत्रासाठी परिचालन, देखभाल व दुरुस्तीसाठी ८ कोटी ९२ लाख खर्च आहे. तसेच, सन २०२१ २२ च्या अर्थसंकल्पात वाढ घट लक्षात घेऊन ६ कोटी ७८ लाख खर्च आहे. ताथवडेतील रस्त्यांसाठी ९५ लाख खर्च आहे. प्रभाग क्रमांक २३ मधील भगवती पाल्म्स ते विजय ट्रेडर्सपर्यंतच्या रस्ते काँक्रिटीकरणासाठी १ कोटी खर्च आहे. प्रभाग २५ वाकड येथील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी २ कोटी खर्च आहे. प्रभाग क्रमांक १२ मांगीरबाबा मंदीर परिसरातील रस्ते डांबरीकरणासाठी ५२ लाख खर्च आहे. त्या खर्चास सभेत मंजुरी देण्यात आली.