पिंपरी (Pclive7.com):- जागतिक वारसा दिनानिमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत चालणाऱ्या ट्रॅव्हल अँड टुरिझम विभागामार्फत आयोजित प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या ‘हेरिटेज फोटोग्राफी’ या विशेष व्याख्यानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. फोटोग्राफीची जोड मिळाली तर टुरिझम क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी कमी कालावधीत व्यवसायात जम बसवू शकतात असे मत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक पर्यटनस्थळे फोटोग्राफीच्या माध्यमातून सर्वपरिचित होण्यास मदत होईल. त्यामुळे ट्रॅव्हल अँड टुरिझम सोबत छायाचित्रणाचा अभ्यास पण महत्वाचा आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश एकार, गणित विभाग प्रमुख प्रा. विजय घारे, आयक्युएसी समन्वयक डॉ. संगीत जगताप, पर्यटन विभाग प्रमुख प्रा. सद्दाम हुसेन घाटवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानाचे प्रास्ताविक करत असताना डॉ. सतीश एकार यांनी देवदत्त कशाळीकर यांचा परिचय करून देत या व्याख्यानाची संकल्पना व उद्देश स्पष्ट केले.
हेरिटेज फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन करताना देवदत्त कशाळीकर यांनी पर्यटन क्षेत्रातील छायाचित्रणाचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करत त्यामधील विविध आयाम व पैलू उलगडून दाखवले. तसेच छायाचित्रणामुळे आपल्या जीवनातील अनेक प्रसंग आठवणीत राहतात असे नमूद करत माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्यामधील संवाद कमी होत आहे, अशी खंत व्यक्त केली. आपल्या व्याख्यान सत्रामध्ये हंम्पी, लडाख, वाराणसी बरोबर भारतातील महत्वाच्या जागतिक वारसास्थळांचा समृद्ध इतिहास विशद करत त्यांनी काढलेल्या छायाचित्रांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी जागतिक वारसा दिनाची संकल्पना व महत्त्व स्पष्ट करत भारतातील जागतिक वारसा स्थळांची माहिती दिली. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून काम करत असताना छायाचित्रणाच्या माध्यमातुन विद्यार्थी स्वतःला कसे विकसित करू शकतात याबाबत माहिती देत जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने भारतामधील ऐतिहासिक स्थळांची संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना देवदत्त कशाळीकर यांनी माहितीपूर्ण उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
सदर व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या सभागृहात ट्रॅव्हल अँड टुरिझम विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या यु – ट्यूब चॅनलवर या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या करिता प्रणित पावले यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. या व्याख्यानाचा सूत्रसंचलन प्रा. सद्दाम हुसेन घाटवाले तर आभार प्रदर्शन प्रा. नागेश भालेराव यांनी केले.