पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक बांधण्यात येत आहे. त्याचे पहिल्या दोन टप्प्यांतील काम झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समिती सभा व सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, नगरसचिव उल्हास जगताप व अधिकारी उपस्थित होते. चिंचवड येथे चापेकर स्मारकाचे काम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात बहुउद्देशीय सभागृह, प्रदर्शन हॉल, ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय, कॉन्फरन्स हॉल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली.

बोपखेल गावठाणापासून खडकीपर्यंत होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणाऱ्या महापारेषण कंपनीच्या अती उच्चदाब विद्युतवाहक तारा व खांब हलविण्यासाठी परवाना व पर्यवेक्षक शुल्क व जागेचा भाडे खर्चाचा यात समावेश आहे. चऱ्होली टप्पा १ मधील २१ एमएलडी व टप्पा क्रमांक दोनमधील २० एमएलडी क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण केंद्राचे चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे. चऱ्होली येथील चोविसावाडी येथे अग्निशामक केंद्र बांधणे, ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जलनिस्सारण नलिकांची व चेंबर्सची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे चोकअप काढणे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील नियोजित सीएसएसडी विभागासाठी ३० केव्हीएचे यूपीएस खरेदी करणे- आकुर्डीतील हभप प्रभाकर कुटे रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालयांची अंतर्गत साफसफाई व स्वच्छता करणे, या कामांसाठी येणाऱ्या खर्चाला मंजुरी दिली.
नेमबाजी प्रशिक्षण केंद्रासाठी संस्था..
कृष्णानगर, चिंचवड येथील स्वामी विवेकानंद क्रीडांगण येथे पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय रायफल व पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठी अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनला दहा वर्षासाठी देण्यात येणार आहे.
Tags: Chapekar SmarakPcmc Standing Committee MeetingPimpri Chinchwad Municipal CorporationStanding Committee





















Join Our Whatsapp Group