पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती होताच शहर भाजपमध्ये उघड उघड नाराजी दिसू लागली आहे. एकाच परिवारामध्ये पक्षाकडून वारंवार पदे देण्यात येत असून आपल्याला पक्षाकडून सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केला आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील १२ ते १३ माजी नगरसेवक नाराज असून आम्ही लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचे काटे यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी (दि.१९) केली. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू तथा माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्तीची घोषणा केली आहे. घोषणा होताच शहर भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
याबाबत चिंचवड विधानसभेतील भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी याबाबत एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यावेळी उमेदवार म्हणून शंकर जगताप यांचे नाव पुढे येताच त्यांना चिंचवड विधानसभेतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात आहेत. यातून भाजपच्या धोरण आणि तत्त्वांना तिलांजली दिली जात आहे. आता शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे शहरातील जुन्या व एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हा निर्णय न पटण्यासारखा आहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी सतत झटणाऱ्यांची त्यामुळे घुसमट होत आहे. सतत होणारा हा अन्याय सहनशक्तीच्या पलीकडे गेला असल्याचेही काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
२०१७ मध्ये महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. या यशामध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह आमचा ही खारीचा वाटा होता. पक्षाने नवख्या नगरसेवकांना महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, विविध समित्यांचे अध्यक्षपद दिले. पाच वर्षांत प्रत्येक वेळी संधी असतानाही मला वारंवार डावलले. त्यानंतरही मी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलो. शहराध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असताना आताही डावलल्याने माझ्यासह चिंचवडमधील १२ ते १३ नगरसेवक नाराज आहेत. सर्व नाराज नगरसेवक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहोत.– शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक, भाजप