ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे केले अवयवदान; शाहूनगर येथील दाम्पत्याचा आदर्शवत निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- अक्षत लोहाडे या चौदा वर्षीय मुलाचा अपघात मागील शुक्रवारी (दि.२५) रोजी सायं. ६ वाजता शाहूनगर येथे झाला होता. अपघातानंतर त्याच्या सोबत असलेल्या वाहनचालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्या अपघातामध्ये अक्षत हा जबर जखमी झाल्याने त्याचा मेंदू निकामी झाला होता.
अक्षत सचिन लोहाडे (वय १४), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अक्षत याचे वडील सचिन हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई सुवर्णा ही विमा प्रतिनिधी आहे. मोठी बहीण विधी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अक्षत हा इयत्ता नववीत शिकत होता.

अक्षत हा २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. जखमी अक्षतला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मेंदू निकामी झाला. मेंदू विकार तज्ञ (Neurologist) डॉ. अमित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला संपूर्ण वैद्यकीय उपचार दिल्यानंतरही त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर वैद्यकीय तज्ञ डॉ.अमित पांडे यांच्या समुपदेशनामुळे अक्षतचे आई – वडील सौ. सुवर्णा व श्री. सचिन लोहाडे यांनी अक्षतचे अवयव दान करण्याचा धाडसी व योग्य असा निर्णय घेतला. अक्षतचे अवयव दान करण्याच्या निर्णयामुळे ७ जणांना त्यांचे आयुष्य मिळणार असून ते अपंगत्वावर मात करणार आहेत.
खरं तर अक्षतचा विरह हा प्रचंड वेदनादायी आहे. परंतू त्याचे अवयव दान करण्याच्या निर्णयामुळे तो खऱ्या अर्थाने ७ व्यक्तींना अवयवाच्या माध्यमातून “साथ” देत “अ-क्षत” ठरला आहे. अवयवदानाने ज्या सात जणांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याला एक वेगळेपण येणार आहे त्याचे मनःस्वी समाधानही अक्षतच्या कुटूंबियांना मिळाले आहे.
अक्षतच्या पार्थिवावर काल दुपारी ३ वाजता धर्मसंस्कारासह अंत्यविधी हा निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे करण्यात आले. अक्षत पंचतत्वात विलीन होत असतांना लाभार्थ्यांवर यशस्वी पध्दतीने अवयवांचे प्रत्यारोपणही झाले आहे.






















Join Our Whatsapp Group