भोसरी (Pclive7.com):- आशा वर्कर असलेल्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा दाबून तिचा खून केला. तसेच स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला शुक्रवारी (दि.१८) चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी त्याने पोलिस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड पिले. उपचारादरम्यान शनिवारी (दि.१९) पहाटे मृत्यू झाला.

शरद रुपचंद चितळे (३३, रा. रुपीनगर, तळवडे) असे विष पिऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कांचन शरद चितळे (वय २६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद चितळे हा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला जात होता. त्याची पत्नी कांचन ही आशा वर्कर होती. कांचन हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला संशय होता. त्यातून त्याने दि.१३ एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना तिचा गळा आवळला. यात ती बेशुद्ध झाली.
तसेच त्याने स्वतः देखील नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तसेच कांचन हिला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, शरद याच्यावर उपचार सुरू होते. त्याला शुक्रवारी (दि.१८) रुग्णालयातून सोडण्यात आले. तसेच कांचन हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद याला नातेवाईकांसह चिखली पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शरद याने फरशी पुसण्याचे लिक्विड पिल्याचे निदर्शनास आले. त्याला नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.






















Join Our Whatsapp Group