पुणे (Pclive7.com):- रिक्षावाला आणि प्रवासी यांच्यात २० रुपये देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रिक्षाचालकाने मित्राच्या मदतीने प्रवाशाला मारहाण केली. या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव असून पुण्यातील रविवार पेठेत हा प्रकार घडला.
मृत तानाजी कोरके हा मूळचा लातूरचा रहिवासी आहे. गेले अनेक दिवस कामानिमित्त तो पुण्यात राहत होता. घटनेनंतर आरोपी रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
२० रुपयांच्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली. ही मारहाण प्रवाशाच्या वर्मी लागल्याने तो रस्त्यावरच कोसळला. त्यानंतर रिक्षा चालकाने प्रवाशाला ससून रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला आपण जखमी प्रवाशाला मदत करत असल्याचे त्याने भासवले, मात्र या प्रवाशाचा उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
पोलीस तपासात रिक्षाचालकाचे बिंग उघडे पडले. परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी रिक्षाचालकाने केलेली मारहाण कैद झाली होती. त्याआधारे फरासखाना पोलिसांनी कारवाई करत अतुल उर्फ ईश्वर हराडे आणि रोहन गोडसे या दोघांना अटक केली.





















Join Our Whatsapp Group