पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे. त्यांचा भाजपामध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या राजीनाम्यात संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे मी सध्या माझी संपूर्ण जबाबदारी अपेक्षेप्रमाणे पार पाडू शकत नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन मी माझ्या शहराध्यक्ष व सदस्य या दोन्ही पदांचा राजीनामा देत आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर वाघेरे यांना पक्षाने मावळ लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत त्यांना तब्बल ५ लाख ९६ हजार एवढी मते मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून संजोग वाघेरे पाटील हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान आज त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला आहे.
नुकतेच संजोग वाघेरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश निश्चित मानला जात आहे.





















Join Our Whatsapp Group