दोन मतदार ओळखपत्र असल्याचे पुरावे निवडणूक विभागाकडे सादर
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ (ब) नागरिकांचा मागासवर्ग पुरुष या प्रवर्गातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अधिकृत उमेदवार गणेश रामराव ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी जोरदार हरकत नोंदवली आहे. ढाकणे यांच्याकडे दोन निवडणूक ओळखपत्रे (EPIC) असल्याचा आणि ते शेवगाव तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच असल्याचा पुरावा वाघेरे यांनी सादर केला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे याबाबतचा निर्णय दुपारी ४ वाजता घेतला जाणार आहे.

वाघेरे यांच्या तक्रारीनुसार, ढाकणे यांचे एक मतदार ओळखपत्र (EPIC क्र. YBC २३६६३८३) विधानसभा मतदारसंघ क्र. २२२ शेवगाव (अहिल्यानगर जिल्हा) येथील आहे, तर दुसरे (EPIC क्र. TOK९४३७३०२) पिंपरी विधानसभा मतदारसंघ क्र. २०६ येथील आहे. याचा अर्थ ढाकणे हे मूळचे शेवगाव तालुक्यातील रहिवासी असून, पिंपरी गावातील प्रभाग २१ (ब) मधून उमेदवारी लढविण्याची पात्रता नसल्याचा आक्षेप आहे. शिवाय, ते हसनापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून सध्या पदावर असल्यानेही उमेदवारी अर्ज अमान्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाघेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे सादर करून ही हरकत नोंदवली. यानुसार, ढाकणे यांना दुपारी ४ वाजेपर्यंत योग्य खुलासा सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदत संपल्यास निर्णय अधिकारी प्रभाग ग येथे अंतिम निर्णय घेतील. ही घटना पिंपरी महानगरपालिका निवडणुकीत तणाव वाढवणारी ठरली असून, स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.






















Join Our Whatsapp Group