सात दिवसांत कारवाई करा, अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन; संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या प्रसिद्ध अप्पूघर परिसरात ४९ झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा करार रद्द करावा, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आपचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना निवेदन दिले.

आम आदमी पार्टीने दिलेल्या निवेदनानुसार, अप्पूघर चालविणाऱ्या खासगी ठेकेदाराने महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडून केवळ १३ झाडांच्या छाटणीची परवानगी घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात ४९ झाडांची खोडापासून कत्तल करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे. हा प्रकार महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम, १९७५ चा भंग असल्याचेही पक्षाने निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेच्याच मालकीच्या जागेत असा प्रकार घडत असेल, तर संबंधित ठेकेदारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विभागाने काय केले, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे.
‘आप’च्या प्रमुख मागण्या
या प्रकरणातील संबंधित ठेकेदारावर महाराष्ट्र वृक्ष जतन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच ठेकेदाराचा करार रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा संबंधित ठेकेदाराला अभय दिल्याचा आरोप असलेल्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी पक्षाने केली आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांच्या जागी तिप्पट संख्येने देशी प्रजातींची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सात दिवसांची मुदत; अन्यथा आंदोलन
अप्पूघर परिसरातील झाडांच्या कथित बेकायदेशीर कत्तलीच्या प्रकरणात सात दिवसांच्या आत ठोस कारवाई करण्यात यावी. अन्यथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अंगद मुगळे, आप नेत्या कविता कोंडे देशमुख आदी उपस्थित होते. आता या प्रकरणात महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















Join Our Whatsapp Group