डॉ. बाबा कांबळे यांचा आरटीओ प्रशासनाला इशारा; बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मागणी
पुणे (Pclive7.com):- खासगी नंबर प्लेट असलेल्या दुचाकींचा टॅक्सी म्हणून वापर करून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा आरोप करत रॅपिडो कंपनीविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत कंपनीवर कायदेशीर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना निवेदन देण्यात आले. रॅपिडो कंपनीच्या बाईक टॅक्सी सेवेमुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे.

खासगी नंबर प्लेटवरून प्रवासी वाहतुकीचा आरोप
रॅपिडो कंपनीकडून आवश्यक शासकीय परवानग्यांशिवाय खासगी नंबर प्लेट असलेल्या दुचाकींचा टॅक्सी म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे शासनाचा कर बुडत असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करून कंपनीवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी डॉ. कांबळे यांनी केली.
न्यायालयीन लढ्याचा दाखला
२०१९ मध्ये पुण्यात रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनानंतर रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा दाखला संघटनेने दिला आहे. त्यानंतर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयीन निर्णय आणि लागू असलेल्या वाहतूक नियमांचे पालन झाले पाहिजे. मात्र, पुणे शहरात पुन्हा बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा आरोप करत संघटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाची कायदेशीर तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या तीन प्रमुख मागण्या
१. बाईक टॅक्सीवर कारवाई : आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा बंद करून संबंधितांवर कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी.
२. ॲपवरील भाडेदर निश्चित करावेत : हकीम समितीच्या सूत्रानुसार ऑटो आणि टॅक्सीचे भाडेदर मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्याची व्यवस्था करावी.
३. चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ : रिक्षा व टॅक्सीचालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे.
आरटीओसोबत चर्चा; आंदोलनाचा निर्धार
आरटीओ अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा पारदर्शक पद्धतीने आणि कॅमेऱ्यासमोर पार पडल्याचे संघटनेने सांगितले. मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, तर रिक्षाचालकांच्या हक्कांसाठी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले.
शिष्टमंडळातील पदाधिकारी उपस्थित..
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात पुणे जिल्हाध्यक्ष संतोष (नाना) गुंड, पुणे शहराध्यक्ष विलास केमसे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय ढगारे, कार्याध्यक्ष दीपक ताठे, युवक अध्यक्ष विशाल ससाने, ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्ष तात्या ठाकूर, उपाध्यक्ष संजय शिंदे, प्रविण शिखरे पाटील, विल्सन मस्के, भाऊसाहेब शेलार, सुरज सोनवणे, शहीद शेख, रविराज कदम, विशाल शिंदे, राकेश मिसाळ, समीर शेख यांच्यासह विविध पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅपिडो बाईक टॅक्सीच्या कायदेशीर स्थितीबाबत आणि रिक्षाचालकांच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.



















Join Our Whatsapp Group