पिंपरी (Pclive7.com):- परदेश दौऱ्यावर गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील ५ नागरिकांना कोरोनाचे संशयित म्हणून वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे घश्यातील द्रव्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ संशयितांचे अहवाल कोरोना आजाराचे ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. या रूग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून वायसीएममधील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, उपमहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक तुषार कामठे, सागर आंगोळकर, नगरसेविका झामाबाई बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार आदी उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील काही नागरिक परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यापैकी पाच संशयित रूग्णांना दि.११ रोजी वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर ३ रूग्णांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आलेत. त्यामुळे या तीन रूग्णांवर वायसीएम रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. या रूग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व इतरांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारिक लक्ष आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयामध्ये कोरोना विलगीकरण कक्षामध्ये १० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच महापालिकेचे भोसरीतील नवीन रूग्णालयात २० बेडचे आयसोलेशन कक्ष तयार करण्यात येत आहे. तसेच पिंपरीतील जिजामाता हॉस्पिटल देखील बांधून तयार असून तेथे देखील ४० बेडची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. आयुक्तांनी अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांसोबत आज भोसरी तसेच पिंपरीतील महापालिकेच्या रूग्णालयास भेट देऊन आढावा घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर हेल्पलाईनचा नंबर 8888006666 हा आहे. आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोरोना आजाराबाबत कोणतेही प्रश्न असल्यास या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच महापालिकेचा वैद्यकीय विभाग तसेच सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणू आजाराविषयी माहिती देण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group