पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना महापालिका प्रशासनाने घेण्यास सुरूवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका कर्माचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी (थम इम्प्रेशन) बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, उपमहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक तुषार कामठे, सागर आंगोळकर, नगरसेविका झामाबाई बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार आदी उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, परदेश दौऱ्यावरून परतलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे वायसीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्यावतीने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज त्यांची बायोमेट्रिक हजेरी (थम् इम्र्पेशन) घेतले जाते. मात्र यातून मशिनवर करण्यात येणाऱ्या बोटांच्या स्पर्शामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येते नाही. म्हणूनच तात्पुरत्या स्वरूपात मार्च अखेरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांची रजिस्टर हजेरी नोंदवली जाणार आहे. तसेच शहरातील सामाजिक संस्था तसेच राजकीय व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम दक्षतेचा उपाय म्हणून रद्द करावेत किंवा काही दिवसांनी घ्यावेत असे आवाहन आयुक्तांनी केले.






















Join Our Whatsapp Group