पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक, आमदार, खासदार, पोलीस निरीक्षक ते पोलीस आयुक्तांपर्यंत तक्रारींचे पत्र देऊनही बेकायदेशीररित्या चालू असलेल्या ताडीच्या दुकानासमोर बसून ताडी पिणाऱ्या तळीरामांचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या रणरागिणींनी एकत्र येऊन गुरुवारी दि.१२ रोजी बेकायदेशीर चालू असलेला ताडीचा ‘अड्डा’ उद्ध्वस्त केला.
चिखली, मोरेवस्ती येथील स्वप्ननगरी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गेल्या १० वर्षापासून ताडी विक्रीचे दुकान आहे. परवाना संपल्याने हे दुकान बेकायदेशीर असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र राजकीय वरतहस्त आणि पोलीस प्रशासनाची मेहेरनजर असल्याने हे दुकान राजरोसपणे सुरू होते. या दुकानाच्या समोरील रस्त्याच्या बाजूला पत्राची कंपाउंड टाकून याठिकाणी तळीराम ताडी पीत बसत होते. अनेक तळीराम तर रस्त्यावरच बसून ताडीत पित होते.
महिलांकडे बघून तळीराम अश्लील शेरेबाजी करत होते. अनेक वेळा महिलांचा पाठलाग करून त्यांची छेड काढली जात होती. महिलांचा हात पकडण्यापर्यंत काही तळीरामांची मजल गेली होती. त्यामुळे दुकान इतरत्र हलवावे अशी पोलिसांसह राजकीय नेत्यांकडे अनेकदा मागणी नागरिकांनी केली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे गुरुवारी संतप्त महिलांनी त्या ताडीच्या दुकानावर आपला मोर्चा वळवला. त्या दुकानाचे पत्र उचकटून ताडीचे बॅरेल फोडले. संतप्त रणरागिणींचा रुद्रावतार बघून तळीराम तसेच ताडी विक्री करणारा दुकानदार तेथून पसार झाला.






















Join Our Whatsapp Group