पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात सध्या १० बेडची व्यवस्था असून तेथे ३ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणूनच महापालिका प्रशासनाने तातडीने भोसरीतील रूग्णालयात ६० बेडची व्यवस्था केली आहे. यामध्ये, महिला आणि पुरुष वर्गासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आज सकाळी भोसरीतील रूग्णालयास भेट दिली. यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. राजेश वाबळे आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या रूग्णालयातील आयसोलेशन कक्षाची सर्वांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.