पिंपरी (Pclive7.com):- मालकाने पगार दिला नाही म्हणून संतापाच्या भरात मालकाची दुचाकी भर रस्त्यात पेटवून दिल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात आज घडली. या घटनेप्रकरणी आरोपी कामगाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे काहीवेळ रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. काही जण दुचाकी जळतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये घेत होते.
अंकित यादव (वय- २७) असं आरोपी कामगाराचे नाव आहे. तर, गणेश उंद्रे पाटील असे मालकाचे नाव आहे. अंकितचा ४० हजार रुपये पगार थकीत होता. म्हणून त्याने संतापाच्या भरात मालकाची दुचाकी भर रस्त्यात पेटवून दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित हा गणेश पाटील यांच्या सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये काम करतो. त्यांची पिंपळे गुरव येथे फॅक्टरी असून गेल्या काही महिन्याचा पगार थकला होता. अनेक वेळा सांगून ही मालक गणेश हे त्याचा पगार देत नसल्याचे अंकितचे म्हणने आहे. म्हणून मालकाने कामानिमित्त दिलेली दुचाकी आज चिंचवड येथे भर रस्त्यात पेटवून दिल्याचे त्याने सांगितले आहे.
घटनेनंतर मद्यपान केलेल्या अंकितला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.























Join Our Whatsapp Group