पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाची दुसरी लस घेतल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. ही घटना रविवारी सकाळी चिखली येथे घडली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार आकाश याचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आकाश विलास कोरे (वय २५, रा. धर्मराजनगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश याने ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक दुसरी लस घेतली होती. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. पर्यायाने, तो घरीच आराम करीत होता.
रविवारी (दि.०३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास जास्तच त्रास होऊ लागल्याने तो घरीच बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मात्र करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
मृत आकाश याचा भाऊ सूरज विलास कोरे यांनी पोलिसांना याबाबत ‘वायसीएम’ रुग्णालयात माहिती दिली. दरम्यान, डॉक्टरांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.