पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ढोल-ताशा पथकांची वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात चाळीसहून अधिक ढोल ताशा पथकाने सहभाग घेत वादन केले. आमदार लक्ष्मण जगताप व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या वतीने ढोलताशा पथक वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिखली येथील शिवतांडव ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. सांगवी येथील मल्हार ढोल ताशा पथकाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक स्वरमुद्रा ढोलताशा पथक वडगाव शेरी यांनी पटकावला. उत्तेजनार्थ मातृभूमी ढोल ताशा पथक, वादक ढोल ताशा पथक यांना बक्षीस देण्यात आली.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220817-WA0044-1-300x300.jpg)
या स्पर्धेत विविध भागातून चाळीसहूनूहून अधिक ढोल ताशा पथके तर १० झांज पथके सहभागी झाली होती. एकाच ठिकाणी अनेक ढोल ताशा पथकांच्या वादनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैदानावर नागरिकांनी गर्दी केली होती. एकाहून एक असे सरस ढोल ताशा पथकांच्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शंकर जगताप, अश्विनी जगताप, जयश्री जगताप-रेणुसे, माऊली जगताप, परिसरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेबाबत बोलताना शंकर जगताप म्हणाले, गणेशोत्सव पार पाडण्यासाठी मागील दोन महिने आधीपासून पथके अथक परिश्रम घेतात. ढोल ताशा वादन ही पारंपारिक विर वादन आहे. गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर श्रमपरिहार व एकाच ठिकाणी वादन होऊन त्यांचे कौतुक व्हावे, हा स्पर्धेमागील उद्देश होता. स्पर्धा पार पाडण्यासाठी सागर अंगोळकर, सुनील देवकर, जीवन जाधव, आदेश नवले, अमित शिंदे, शुभम गायकवाड, आदित्य म्हस्के, शिवादित्य ढोल ताशा पथक, शंकरशेठ जगताप मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.