मोशी (Pclive7.com):- मोशी परिसरातील मंत्रा मोमेंट हाउसिंग कमर्शियल ऑफिसच्या गाळा क्रमांक ७ जवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायल ११२ वर कॉल प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले. तेथे अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. महिलेने भगव्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर निळसर रंगाचे जॅकेट आणि काळसर व हिरव्या पट्ट्यांची ट्रॅक पँट परिधान केली होती.

अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणावरून महिलेवर हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली आणि तिचा खून केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोजराज मिसाळ करीत आहेत. घटनेनंतर परिसरात शांतता असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. मृत महिलेची ओळख आणि आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.


















Join Our Whatsapp Group