पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश झाले
वाढदिवस विशेष… IPS कृष्ण प्रकाश
पिंपरी (Pclive7.com):- 1986…. 12 वीत शिकणारा एक सामान्य कुटुंबातील तरुण, आपल्या शेजा-या कडून सार्वजनिक विहीरीवर होणाऱ्या अतिक्रमणाला विरोध करतो, वाद विकोपाला जातो, दुसऱ्या दिवशी पोलीस अधीक्षक घटनास्थळी येतात तेव्हा त्यांना तुम्हाला रोड मॅप नकाशा कळत नाही का ….? सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आपलं कर्तव्य आहे असं निडरपणे सांगतो. सर्वांसमोर एका युवकाने केलेला जाहीर अपमान पचवत पोलीस अधीक्षक निघून जातात, मात्र पुढच्या आठवड्यात त्या तरुणाच्या शेजारच्या घरात चोर शिरतात चोर…..चोर असा आरडाओरडा होतो तरुण मदतीसाठी धावतो मात्र चोर पळून जातो, दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी पोलीस येतात आणि त्या तरुणाला गाडीत टाकुन पोलीस स्टेशनला घेऊन जातात, पोलीस स्टेशनचा इंचार्ज त्याला दटावतो, पोलीस हवालदर त्याच्यावर बंदुकीच्या संगीन रोखतात आणि न केलेला गुन्हा कबूल करायला सांगतात,मात्र तरुण डगमगत नाही हे बघून त्याला लॉकअप मध्ये टाकलं जातं आणि रात्रभर मानसिक छळ करून 3 वाजता त्याला घरी नेऊन सोडलं जातं..
रागाने लालबुंद झालेला तरुण सकाळी परत पोलीस स्टेशनच्या आवारात दाखल होतो, तेव्हा त्याच्या पाठीवर दगडाने भरलेली बॅग असते, बॅगेत आणलेल्या दगडाचा मारा करून रात्री ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला त्याचं डोकं फोडण्याच्या तयारीत बसलेल्या त्या तरुणा पुढे अचानक त्याचे बाबा येतात, त्याला विचारतात तू काय करतोयस ? तेव्हा तो तरुण म्हणतो मला पोलीस अधिकाऱ्याला मारायचं आहे त्याने माझ्यावर फार अन्याय केला त्याच्या चुकीला माफी नाही असं सांगतो तेव्हा त्या तरुणाचे बाबा त्याला एक सल्ला देत “एका चुकीचं उत्तर आपण दुसरी चूक करून द्यायच नसतं तर चूक वाटणाऱ्या गोष्टी बरोबर करायच्या असतात, असं सांगतात, अन्यायाला पाठीशी न घालणा-या पोलीस अधिकारी बाबाने दिलेला हा सल्ला त्या तरुणाच्या मनावर एवढा ठसतो की तो थेट IPS पोलीस अधिकारी बनायचं ठरवतो आणि तो बनतोही तो तरुण दुसरा तिसरा कुणी नसून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आहेत..
ही पार्श्वभूमी वाचून तुमच्या लक्षात येईल की जो माणूस गुन्हेगार झाला असता तो आपल्या जिद्दीच्या जोरावर आज गुन्हेगारांचा कर्दनकाळ झाला, झारखंडचा मूळ रहिवासी असलेला हा व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावतो आहे.. कृष्ण प्रकाश यांना पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारून येत्या सप्टेंबर मध्ये 1 वर्ष पूर्ण होईल , या एक वर्षात त्यांनी काय केलं तर हा अधिकारी लोकाभिमुख अधिकारी म्हणून सामन्यांच्या पसंतीस उरलायं यात तिळमात्र शंका नाही,अर्थात दिग्गज मंडळी त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडतील तो विषय अलाहिदा…
कृष्ण प्रकाश आणि माझी पहिली भेट, त्यांनी जेव्हा आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली त्याच दिवशी झाली, त्या आधी आणि आत्ताही या माणसाबद्दल असलेली प्रचंड उत्सुकता कायम आहे कारण एका अर्थाने हा माणूस गूढ आहे. पण कोणत्याही व्यक्तीबद्दल जाहीरपणे मत व्यक्त करण्याचे आधी त्याचं सामाजिक अंग तपासणं गरजेचे असते आणि सामाजिक अंगाने हा माणूस राजा मनाचा आहे हे निर्विवाद सत्य आहे
त्यांच्या सामाजिक व्यवहारा बद्दल अनेकांची अनेक मत असू शकतात मात्र जेष्ठ विधिज्ञ विशेष सरकारी वकील. #adv_shishir_hirey शिशीर हिरे सर म्हणाले कृष्ण प्रकाश असे अधिकारी आहेत जे “आमच्या कडे नियमित पाणी पुरवठा होत नाही एवढ्या साध्या आणि आपल्या अखत्यारीत नसलेल्या तक्रारीचीही दखल घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी अक्खं सिस्टीम हलवतात, याचं माणसाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा अधिकारी आपल्या वागण्यातून क्षणार्धात कुणालाही मित्र बनवतो अर्थात हे कसब अनेकांमध्ये असतं.
मात्र जोडला गेलेला प्रत्येक मित्र आपल्या सारखाच शिस्तप्रिय, देशप्रेमी आणि कुटुंबप्रेमी असायला हवा असा त्यांचा शिरस्ता आहे, कृष्ण प्रकाशच्या सहवासात असा समाज निर्माण होतोय हे अभिमानाने सांगावस वाटतं” अडव्होकेट हिरे सरांनी कृष्ण प्रकाश यांचं केलेलं गुणवर्णन तंतोतंत खरं आहे किंबहुना याच कारणासाठी ते अनेकांना आवडतात. मला मात्र कृष्ण प्रकाश भित्रे आहेत म्हणून आवडतात.
Happy Birthday Sir, Krushna Prakash IPS
-गोविंद अ. वाकडे






















Join Our Whatsapp Group